Ahmednagar | पोलिसांचे कर्तव्य म्हणजे नागरिकांची सुरक्षा असून, हीच पोलिसांची खरी भक्ती असल्याचे मत कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस ठाण्यातील गणरायाला निरोप देताना आपल्या कर्मचाऱ्यासमोर मांडले. येत्या काळातही कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना सुरक्षेचे वातावरण आणि त्यांचे प्रश्न तात्काळ सोडविण्याचा संकल्प पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी केला.
कोतवाली पोलीस ठाण्यात गणरायाला बुधवारी (ता.२७) मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांसह सर्व अंमलदारांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर राहून सेवा देण्याचा संकल्प केला. पोलीस नेहमीच सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी २४ तास काम करीत असतात. मग ऊन, वारा, पाऊस काही असो पोलीस नावाचा माणूस सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतो. याच भूमिकेतून कोतवाली पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू असून यापुढेही नागरिकांना सुरक्षित वातावरण आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर सेवा कशी देता येईल, याचा प्रयत्न प्रत्येक अधिकाऱ्याने व अंमलदारांनी केला पाहिजे, असे मत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यावेळी मांडले. पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत सर्व जाती धर्माच्या मिरवणुका नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे शांततेत पार पडल्या. याही पुढे सर्वच धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका या शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांसोबत संवाद वाढवणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकारी रवींद्र पिंगळे गजेंद्र इंगळे प्रवीण पाटील विश्वास भानसी अश्विनी मोरे शितल मुगदे सुखदेव दुर्गे व कर्मचारी सुरेश गर्गे दीपक साबळे योगेश भिंगारदिवे शाहिद शेख रवी टकले तन्वीर शेख योगेश खामकर अमोल गाडे आदी उपस्थित होते.
…………………………………
अपघातांमध्ये तसेच गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली शेकडो वाहने कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात पडून होती. पोलीस निरीक्षक यादव यांनी मूळ मालकांचा शोध घेऊन यातील १२० वाहने परत केली. चोरीला गेलेले तसेच पोलीस ठाण्याच्या आवारात पडून असलेले वाहन परत मिळाल्याने नागरिकांनी कोतवाली पोलिसांचे आभार मानले.
…………………….
अकरा लाखांचे ६५ मोबाईल मूळ मालकांना परत
कोतवाली पोलिसांनी चोरीला गेलेले व गहाळ झालेले महागडे मोबाईल तक्रारदारांना परत केले आहेत. कोतवाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरी गेलेले ६५ मोबाईल हस्तगत केले. अकरा लाख ६ हजार रुपये किमतीचे मोबाईल तक्रारदारांना पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी परत केले आहेत.