अहमदनगर – अहमदनगर शहरातील तोफखाना हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचे गेल्या अनेक दिवसापासून धिंडवडे काढले जात असताना पोलिसांचा संवेदनशीलपणा देखील चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ साहित्यिक तथा लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर कुलकर्णी यांनी तक्रार दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाणे गाठले खरे मात्र पोलिसांचा संवेदनशीलपणा इतका कि कुलकर्णी यांची तक्रार तासंतास बसवून ठेवल्यानंतर घेण्यात आली. दरम्यान कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दखल घेत कारवाईचे आदेश दिल्यानंतर आपण एवढे मोठे असल्याचे आधीच सांगायचे ना असा केविलवाणा उलट प्रश्नच तोफखाना पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने केला होता! यावरून तोफखान्याचे पोलीस अधिकारी किती संवेदनशीलतेने आपली जबाबदारी पार पाडतात याचाच प्रत्यय समोर आला आहे.
तोफखाना हद्दीमध्ये कुलकर्णी यांच्यावर झालेलया हल्ल्याची हि पहिली घटना नव्हे तर अश्या एक ना अनेक घटना या हद्दीत घडल्या असून तोफखाना पोलिसांचा गुन्हेगारांवर असलेला धाक संपला कि काय हाच प्रश्न उपस्थित झाला आहे. भागानगरे खून प्रकरण, अंकुश चत्तर खून प्रकरण, हेरंब कुलकर्णी हल्ला प्रकरण, यासह एक ना अनेक गुन्हे या हद्दीत घडले असून तोफखाना पोलिसांची आबरू अश्या घटनेमुळे चव्हाट्यावर आली आहे.त्यामुळे पोलीस ठाण्याला खमक्या अधिकाऱ्याची गरज असल्याची मागणी आता नागरिकांमधून होत आहे. खरंतर तुम्ही कोण आहे हे पहिले सांगायचे ना असा उलट प्रश्न कुलकर्णी यांना केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याची संवेदनशीलता यातून दिसून आली. आपण जर एखाद्या पक्ष आणि पार्टिचे पदाधिकारी असाल किंवा आपण कोणी विशेष व्यक्ती असाल तरच आपली लागलीच दखल घेतली जाईल अन्यथा आपण कोणीही असले तरी आम्ही आमच्या वेळेप्रमाणे तुमची तक्रार घेऊ एकंदरीत असाच संदेश या अधिकाऱ्याच्या वतीने सामान्य जनतेला देण्यात आला आहे?
खरंतर साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेला हल्ला हा महाविद्यालयाच्या परिसरात अवैध गुटखा तसेच पान विक्री करण्याची टपरी महानगर पालिकेच्या माध्यमातून हटविल्याच्या रागातून केला असल्याचं समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना अटक केल्यानंतर हल्ल्या मागच्या कारणांची प्रेसनोटच जाहीर केली होती. एकीकडे टपरी काढल्याच्या रागातून कुलकर्णी यांच्यावर हल्ला होतो मात्र त्या टपरी मध्ये विकत असलेल्या गुटखा मालाची माहिती पोलिसांना होत नाही हे देखील विशेषच कि हो….? कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली खरी मात्र झालेल्या हल्ल्याला सार्वजनिक केल्यानंतर पोलिसांनी एक्शन घेतली आहे. जर एखाद्या जेष्ठ आणि प्रसिद्धीकार असलेल्या साहित्यिक लेखकावर हि वेळ आहे तर सर्वसामान्यांनी जायचे कोणाकडे… तोफखाना पोलीस हे व्यक्ती विशेष असल्यावरच कारवाई करणार असल्याने अश्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या असा प्रश्न आता सर्व सामान्य नागरिकांना पडला असून तोफखाना पोलीस ठाण्यात खमक्या अधिकाऱ्याची गरज असल्याची देखील चर्चा होत आहे…..