बिश्नोई गँगकडून जिवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर बॉलिवूड स्टार सलमान खानने मुंबई पोलिसांकडे शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आहे. यासंबंधी त्याने शुक्रवारी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. सलमान खान यांचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमकीचे पत्र मिळाले होते.
लॉरेन्स बिष्णोईवर पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेविषयी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
तूझा सिद्धु मुसेवाला करू!
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. सलमानचा न्याय हा न्यायालयाच्या न्यायानुसार होणार नाही, त्याने आणि त्याच्या वडिलांनी जनतेसमोर येऊन जाहीर माफी मागावी अशी मागणी त्याने केली होती. तसे न झाल्यास सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करु अशी धमकी देण्यात आली होती.काळवीट प्रकरणी सलमानला धमकी देण्यात आली होती
लॉरेन्स बिश्नोई याने काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या हत्येचा कट रचला होता. बिश्नोई समाज काळवीटला पवित्र मानतो आणि त्याची शिकार केल्याबद्दल सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
जोधपूरमध्ये हत्या करण्याचा आखला होता कट
2008 मध्ये कोर्टाबाहेर लॉरेन्स बिश्नोईने जोधपूरमध्ये सलमान खानला मारणार असल्याचे उघडपणे म्हटले होते. “आतापर्यंत मी काहीही केले नाही, पण जेव्हा मी सलमान खानला मारल तेव्हा तुम्हाला कळेलच. सध्या मला उगाच या प्रकरणात खेचले जात आहे,” असे तो म्हणाला होता.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई ?
पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची दहशत आहे. तो सध्या तुरुंगात असला तरी तेथूनच तो दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात गुन्हेगारी विश्वातील आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतोय. लॉरेन्स हा पंजाबच्या फजिल्ला येथील अबोहर भागातील रहिवाशी आहे. त्याच्याविरोधात आतापर्यंत 50 हून अधिक लोकांच्या हत्येचा आणि हत्या करण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.