उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी : बोराटे :
प्रतिनिधी नगर
उच्च न्यायालयाने मनपा कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्याबाबत दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
बोराटे यांनी मंत्री शिंदे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. मनपाच्या विविध खात्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या सेवेत वारसा हक्कानुसार सामावून घेण्याबाबत कामगार युनियन व तत्कालीन नगरपरिषदेमध्ये १९७९ साली करार झाला होता. मात्र, सन २००० ते २००५ या काळात या करारानुसार कर्मचाऱ्यांच्या वारसांना याचा लाभ
मिळाला नाही. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट पीटीशन दाखल करण्यात आले होते. खंडपीठाने सुनावणी घेवून वारस अर्जदारांना वारसा हक्काने नेमणुका देण्याबाबत करारातील तरतुदीनुसार वर्ग ३ व वर्ग ४ मध्ये नेमणुका, तसेच कायदेशीर नुकसानभरपाई देण्याबाबत २२ मार्च रोजी अंतिम निकाल दिलेला आहे. निकालाची ३० एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश मनपा प्रशासनास दिलेले आहेत.
न्यायालयाच्या निकालाची मनपाने तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनपाकडे करण्यात आलेली आहे. मात्र त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या विषयात लक्ष घालून उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
बातम्यांसाठी संपर्क 9112307272