अहमदनगर – अहमदनगर शहरातील एकविरा चौकात शनिवारी रात्री सामाजिक कार्यकर्ते असलेले अंकुश चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात चत्तर यांची हत्या झाली आहे. शनिवारी रात्री ११ च्या सुमारास एकविरा चौक येथे दोन गटात वाद झाला होता. सुरु असलेला हा वाद सोडविण्यासाठी अंकुश हे एकविरा चौक येथे आले. सुरु असलेला वाद मिटवून चत्तर हे परत जात असतांना काळ्या रंगाच्या चारचाकी गाड्यातून आलेल्या गुंडांनी अंकुश चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हातामध्ये लोखंडी रॉड, लाठ्या काठ्यासह तब्ब्ल ७ ते ८ जणांनी चत्तर यांच्यावर हल्ला केला. अंकुश चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने ते रक्तबंबाळ झाले व लागलेला मार जबर असल्याने ते बेशुद्ध देखील झाले होते. दरम्यान चत्तर यांना बेशुद्ध अवस्थेत शहरातील एका खाजगी दवाखान्यात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. अखेरकार चत्तर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
चत्तर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरा विरोधात ३०७ नुसार गुन्हा दाखल केला असून फिर्यादीत हल्ला करणारा हा चक्क भाजपाचा नगरसेवक स्वप्नील शिंदे व त्याचे साथीदार असल्याचे नमूद करण्यात आले आहे, भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदे व सामाजिक कार्यकर्ते अंकुश चत्तर यांच्यात पूर्वीपासून वाद होते आणि त्यामुळेच चत्तर यांचा एकांत असल्याचा फायदा घेत नगरसेवक शिंदे सह त्याच्या साथीदारांनी चत्तर वर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चत्तर याला संपवून टाका असं मोठमोठ्याने शिंदे म्हणत असल्यानेच चत्तर यांच्या डोक्यात रॉड मारण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.
वास्तविक चत्तर आणि नगरसेवक शिंदे यांच्यात पूर्वीपासून सुरु असलेला वाद हा नेमका कोणत्या कारणावरून होता हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पूर्ववैमनस्यांतून चत्तर यास जीवे ठार मारण्यात आले. रात्री ११ च्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर अज्ञात इसमांनी एकविरा चौक परिसरातील एक चहाची टपरी देखील पेटवली, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला रोखले होते. पोलिसांनी या घटनेसंदर्भात जीवे ठार मारण्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता यामध्ये भाजपा नगरसेवक स्वप्नील शिंदेसह त्याच्या इतर ७ ते ८ साथीदारांचा समावेश आहे. मात्र आता जखमी चत्तर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नगरसेवक स्वप्नील शिंदेसह त्याच्या साथीदारांवर वाढीव जीवे ठार मारण्याच्या ३०२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
खरंतर अहमदनगर शहरात चाललंय तरी काय हाच प्रश्न कदाचित तुम्हाला देखील पडला असेल. शहरात घडणाऱ्या घटनांना बघता अहमदनगरचा बिहार झाला आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे, परंतु हे शब्द आता जुने झाले आहे बरोबर ना, खरंतर अश्या घटनांना पोलीस प्रशासन देखील तितकेच जबाबदार आहे. रात्रीच्या काळोख्या अंधारात शहराच्या रस्त्यांवर रक्तरंजित जीवघेणे हल्ले होत असतांना पोलिसांचा दरारा संपला आहे असे चित्र सध्या नगर शहरात दिसत आहे. कोणी तलवारी घेऊन हत्या करतो तर कोणी लोखंडी रॉड घेऊन जीव घेतो, घटना घडली तर पोलीस घटना स्थळी पंचनामा करतात आणि आरोपीच्या शोधासाठी रवाना होतात मात्र अश्या घटना रोखण्यासाठी किंवा पोलिसांची भीती गुन्हेगारांच्या मनात निर्माण करण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला हि कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसत नाही, त्यामुळे अहमदनगर शहराच्या रस्त्यावर पडलेल्या रक्ताचे शिंतोडे खाकिला देखील डाग लावण्याचा काम करत आहे एवढेच….