(अहमदनगर) – विरोधकांचा आवाज दाबून सत्ता पुन्हा टिकवण्याचा प्रयत्न मोदी सरकारचा सुरू आहे. देश राज्यघटनेप्रमाणे चालणार की नाही? हुकुमशाही पद्धतीने देश पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्म-जातीत भेद निर्माण करून भांडण लावायचे व सत्ता मिळवण्यासाठी सुरू असलेले तंत्र, देशहिताचे नाही. स्वातंत्र्याचे एक युद्ध आपण लढलो, पुन्हा दुसऱ्या स्वातंत्र्याची चळवळ निर्माण करण्याची गरज कार्यकर्त्यांवर जनतेवर येणार आहे, अशी परिस्थिती निर्माण होत आहे, अशी आक्रमक टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर केली.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना ईडी चौकशीला बोलावल्यानंतर मोदी सरकारच्या निषेधार्थ अहमदनगरमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलने करण्यात आले. याप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, प्रदेश सचिव सचिन गुंजाळ, कार्याध्यक्ष सचिन गुजर, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, साई संस्थानचे विश्वस्त करण ससाणे, प्रदेश सरचिटणीस विनायकराव देशमुख, प्रदेश सचिवहेमंत ओगले आदी उपस्थित होते. यावेळी बंद करा, बंद करा, तपासांतरांचा गैरवापर बंद करा, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, राजकीय सत्तांतरानंतर प्रथमच मंत्री थोरात नगरमध्ये आंदोलनात उतरले.
हे जनतेला समजतंय
थोरात म्हणाले, आयटी, ईडी, इनकम टॅक्स, सीबीआयचा वापर करून देशात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातील सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न ईडीच्या सहाय्याने केला जात आहे. महाराष्ट्रातील उदाहारण चांगले आहे, एक दिवस आरोप होतो, ईडीच्या ऑफिसला गेल्यानंतर दुसऱ्यादिवशी भाजपमध्ये जातो आणि निर्दोष होतो, हे काय चाललंय हे जनतेला समजतंय.
मै इंदिराजी की बहू
सोनियाजी आजारी होत्या, त्यानंतर त्या विश्रांती घेत असताना त्यांना ईडीने चौकशीसाठी पाचारण केले. त्यांनी जाताना सांगितले की, ‘मै इंदिराजी की बहु हूं, मै डरती नही.’ नॅशनल हेरॉल्ड यामध्ये कोणताही घोटाळा नसताना देखील गैरसमज निर्माण केला जात आहे.सद्यस्थितीत विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरू आहे, असेही मंत्री थोरात यांनी स्पष्ट केले.