बीडः महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय भाजप नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांची ख्याती आहे. त्यामुळे यंदाच्या राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र भाजपकडून अन्य दोन उमेदवारांची नावं उघड झाल्यानंतर राज्यसभेची चर्चा बंद झाली आणि विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 20 जून रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहेत. त्यात पंकजा मुंडे यांचंही नाव आहे. याविषयी पंकजा मुंडेंनीही सांकेतिक प्रतिक्रिया दिली. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्तच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘विधान परिषदेच्या उमेदवारीविषयी पक्ष लवकरच निर्णय घेईल.’
भाजपकडून कुणाची नावं?
विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून अद्याप दोन नावांवर शिक्कामोर्तब झालंय. यात भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचं एक नाव आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवक्तीय प्रसाद लाड यांचंही नाव फायनल झाल्याची माहिती आहे. आता उर्वरीत दोन जागांसाठी माजी मंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे, चित्रा वाघ आणि संजय पांडे यांची नावं चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे यांच्याही नावाची चर्चा होती. इच्छुक उमेदवारांची फडणवीसांकडे लॉबिंग सुरु असल्याच्याही चर्चा आहेत. त्यामुळे या सर्वांतून पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळते, का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.