अहमदनगर : शहरातील बसस्थानक परिसरातून वाहन घेऊन जात असताना एका मद्यपीला कट लागल्याचे कारण देऊन चालकाला तीन ते चार लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. चालकाची चूक नसताना भाईगिरी करत मारहाण करणाऱ्या टोळक्याचा माज कोतवाली पोलिसांनी चांगलाच जिरवला आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दोन आरोपींना तात्काळ अटक करून जेलची हवा खाऊ घातली आहे.
वाहन चालक अशोक दगडु खंडागळे (वय ३२, वर्ष, रा. सर्वे १०६ हडपसर, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक दगडु खंडागळे हे त्यांचे वाहन सगम हॉटेल समोरून घेऊन जात असताना एक मद्यपी वाहनासमोर आला. त्याच ठिकाणी उभे असलेल्या चार ते पाच जणांच्या टोळक्याने खंडागळे यांना विनाकारण लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस जवान घटनास्थळी पोहोचताच आरोपींनी पळ काढला. कोतवाली पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता वाहनाचा कट बसलेला इसम हा खूप मोठ्या प्रमाणावर दारूच्या नशेत होता. त्यामुळे तो स्वतःहून वाहनाच्या समोर आला व त्याला वाहनाचा कट बसला. त्यानंतर चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर कोतवाली पोलिसांनी तात्काळ सेजल अस्लम मन्यार (वय २४ वर्ष, रा. माळीवाडा, ढोर गल्ली, अहमदनगर), साहील कासीम शेख (वय २२ वर्ष रा. पंचपीर चावडी, बागवान गल्ली अहमदनगर) या दोन आरोपींनी अटक केली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही घटना गांभीर्याने घेऊन भाईगिरी करणाऱ्यांना जेलची हवा दाखवली आहे. तसेच याउपरही विनाकारण शहरात शांतता भंग करू पाहणाऱ्यांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा कोतवाली पोलिसांनी दिला आहे.
नगर कॉलेजजवळ वाद घालणाऱ्या दोघांना अटक काही दिवसांपूर्वी नगर कॉलेज परिसरात सुद्धा दोन गटांत तणावाची परिस्थिती निर्माण करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी जेलची हवा खाऊ घातली आहे. कॉलेज परिसरामध्ये दोन वेगवेगळ्या धर्माचे जमाव जमा करून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न दोन तरुणांनी केला होता. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी त्यांना अटक केली.
दादागिरी खपवून घेणार नाही : चंद्रशेखर यादव
कोणतीही व्यक्ती अथवा एखाद्या टोळक्याकडून सर्वसामान्यांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास नागरिकांनी पोलिसांसोबत संपर्क करावा.
विनाकारण शिवीगाळ करणे, रस्त्यात बाचाबाची करणे, मारहाण करणे, दारू पिऊन दंगा करणे, अशा प्रकारे त्रास देत असल्यास कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करावी अथवा थेट ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना संपर्क करावा. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा पोलीस निरीक्षक यादव यांनी दिला आहे.