दीड लाखांचा ऐवज लंपास; गुन्हा दाखल
अहमदनगर – नाशिक येथून मोडनिंब (जि.सोलापूर) कडे ● जाणाऱ्या दोन महिलांना नगर शहराजवळ अज्ञात 4 इसमांनी 1 लाख 41 हजार 500 रुपयांना लुटल्याची घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी 10 ते 10.30 च्या दरम्यान घडली. याबाबत पल्लवी प्रथमेश चिंचले (वय 30, रा. सूर्या पार्क, आरटीओ ऑफीस जवळ, नाशिक) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी पल्लवी व त्यांची आई अशा दोघी जणी नाशिकहून नगरला आल्या होत्या. येथून मोडनिंब (जि. सोलापूर) येथील नातेवाईकांकडे जाण्यासाठी त्या चांदणी चौकात वाहनाची वाट पाहत गुरुवारी (दि. 16) सकाळी 10 च्या सुमारास थांबलेल्या होत्या. त्यावेळी मोटारसायकलवर आलेल्या एका अनोळखी इसमाने त्यांना कोठे जायचे आहे? असे विचारले. त्यांनी मोडनिंबला जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत असल्याचे सांगितल्यावर येथून लवकर वाहन मिळणार नाही, मी तुम्हाला पुढे बस स्टॉपवर सोडतो, असे म्हणत त्यांना त्या इसमाने मोटारसायकलवर बसवले. त्यानंतर त्याने सोलापूर रोडने वाळुंज शिवारात रेल्वे लाईनजवळ रोडच्या आडबाजूला मोटारसायकल नेली. त्यावेळी त्याचे अन्य 3-4 साथीदारही तेथे आले. या सर्वांनी दोन्ही महिलांना बांबूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या जवळील सोन्याचे दागीने, रोख रक्कम, मोबाईल असा सुमारे 1 लाख 41 हजार 500 रुपयांचा ऐवज बळजबरीने हिसकावून ते घेऊन गेले.
यामध्ये 16 ग्रॅम वजनाची सोन्याचे चेन, 6 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉप्स, फिर्यादी पल्लवी यांच्याकडील 4 हजार 500 रुपयांची रोकड, 20 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल, 6 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याच्या रिंगा, 6 ग्रॅम वजनाची सोन्याचे मणी असलेली पोत, फिर्यादी पल्लवी यांच्या आई भारती यांच्याकडे असलेली 15 हजार रुपयांची रोकड, त्यांच्याकडील 17 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, त्यांच्या जवळील 4 एटीएम कार्ड, बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, आधारकार्ड अशी कागदपत्रे यांचा समावेश आहे. लूटमार झाल्यानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन गाठले व फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 394, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.