अहमदनगर- नळावर पाणी भरण्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये वादावादी झाली व वादावादीचे पर्यावसन हाणामारीत होऊन एका जणावर कोयत्याने वार करुन त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना बुधवारी नगर शहरातील चौपाटी कारंजा परिसरात घडली. या मारहाणीत जखमी झालेल्या खलील यासीन सय्यद यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत जखमी खलील सय्यद यांच्या पत्नी रेश्मा खलील सय्यद (रा. फरहातखाँ मस्जिद, डॉ. सुनील जाधव हॉस्पिटल समोर, चौपाटी कारंजा) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सय्यद यांच्या शेजारी वसिम फारुख शेख यांचेफिर्यादी सय्यद यांच्या शेजारी वसिम फारुख शेख यांचे कुटुंबिय राहतात. फिर्यादी सय्यद यांच्याकडे पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रीक मोटार नसल्याने त्या वसिम शेख यांना दरमहा 150 रुपये भाडे देवून पाणी भरतात. बुधवारी (दि.1) सकाळी वसिम शेख याची पत्नी रेशम वसिम शेख हिने त्यांचे पाणी भरल्यानंतर मोटार बंद केली. त्यावेळी फिर्यादीचे पती खलील सय्यद यांनी रेशम शेख हिला “आम्हाला पाणी भरायचे आहे, तू मोटार बंद का केली” अशी विचारणा केली असता त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच तिचा पती वसिम शेख, युसुम फारुक शेख, आक्रम शेख, कुदुस शेख यांना फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर या चौघांनी तसेच रेशम, आशा व यास्मिन यांनी खलील सय्यद यांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वसिम फारुख शेख हा घरात जावून कोयता घेऊन आला व त्याने पाठीमागून येवून खलील सय्यद यांच्या पाठीवर, कंबरेवर कोयत्याने वार केले. तसेच इतरांनी लाकडी दांडक्याने डोक्यास मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सदरचे भांडण सोडवले.
या मारहाणीत खलील सय्यद यांना जबर दुखापत झाल्याने त्यांना रिक्षात टाकून प्रारंभी एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर रेशमा खलील सय्यद यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध भा.दं. वि.क. 307, 323, 504, 506, 109, 143, 147, 148, 149, शस्त्र अधिनियम 4/25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दुपारी उशिरा जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खलील सय्यद यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.