शेवगांव तालुक्यातील आंतरवली बु. ग्रामस्थांनी क्रांतीदिनानिमित्त सामुहिक राष्ट्रगान व डॉ. सुधा कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीजन्माच्या स्वागताचा ठराव संमत केला. यानिमित्त अनिल गायकवाड यांच्या घरी जाऊन नवजात बालिका, आई, वडिल, बहिण व आजी यांचा सन्मान करण्यात आला.
क्रांतीदिनी आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या स्त्रीजन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉ. सुधा कांकरिया उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, भारताच्या स्वातंत्र्य लढयात आहुती देणाऱ्या सर्व शहिद वीरांना, स्वातंत्र्य सैनिकांना, प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व देशभक्तांना मी प्रणाम करते त्यांच्या मुळेच आपण आज आझादी का अमृतमहोत्सव साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना देशात असणारे अनेक प्रश्नापैकी स्त्रीभ्रुणहत्या हा गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी घरोघरी स्त्रीजन्माचे स्वागत झाले, तरच स्त्रीपुरूष समानता राखता येईल. क्रांतिदिनाच्या दिवशी स्त्रीजन्माच्या स्वागताचा ठराव घेऊन एक क्रांतिकारी पाऊल ग्रामस्थांनी टाकलेले आहे त्याचे मी अभिनंदन करते. या प्रसंगी फक्त मुली असणाऱ्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात वर्धिनी ग्रुपच्या महिलांचा सन्मान करण्यात आला. रामेश्वर पालवे यांनी स्वागत केले तर ग्रामसेवक भाऊसाहेब आंधळे यांनी आभार मानले. त्यावेळेस मुख्याध्यापक गरकळ, माजी सरपंच भारत कापसे, बबन शिंदे, विठ्ठल कापसे, रामेश्वर पालवे, कोळगांवचे सरपंच झिरपे पाटील हे मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी ‘हर घर तिरंगा’ राबवण्याविषयीचे आवाहन डॉ. कांकरिया यांनी केले.