अहमदनगर: ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत नगरच्या पोलीस दलाने यशस्वी कामगिरी केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये २०० लहान मुलांच्या अपहरणाच्या गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ७७ बालकांचा शोध घेण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, आयपीएस अधिकारी आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक राम ढिकले, सुनील गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. ‘लहान मुले हरवल्याबाबतचे गुन्हे वगळले, तर जिल्ह्यामध्ये एकूण २ हजार ३०१ व्यक्ती हरवलेल्या होत्या. त्यापैकी १ हजार ११ व्यक्तींचा शोध ऑपरेशन मुस्कान अंतर्गत घेतलेला आहे. त्यामध्ये १ हजार २१० महिलांपैकी ६२१ व १ हजार ९१ पुरुषांपैकी ३९० जणांचा शोध घेण्यात आलेला आहे.’ १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये शोध घेताना रेकॉर्ड बाहेरील ४७ मुले आढळून आली आहेत. त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. घरातून निघून गेलेली, त्रासाला कंटाळून घराबाहेर गेलेली ही मुले पुन्हा कुटुंबात सुखरूप परतल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, असेही पाटील म्हणाले. नोडल अधिकारी बाजीराव पोवार, सोमनाथ कांबळे, अर्चना काळे, रीना म्हस्के, मोनाली घुटे, छाया रांधवण, रुपाली लोहारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.