पिंपरी: संपूर्ण कुटुंबाला सतत त्रास देतो आणि वेळप्रसंगी मारहाणही करतो, म्हणून वडिलांनीच तरूण मुलाचा खून केल्याची घटना मोशी येथे उघडकीस आली आहे.
युवराज अशोक सावले (वय-२२, रा. जुन्या जकात नाक्याजवळ, मोशी) असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडील अशोक शिवाजीराव सावले (वय-४९, रा. मोशी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जूनला पहाटे तीनच्या सुमारास युवराजच्या डोळ्यात सर्वप्रथम मिरची पूड टाकण्यात आली.त्यानंतर, धारदार शस्त्राने तसेच लोखंडी पाईपने डोक्यात घाव घालून त्याचा खून करण्यात आला. युवराज हा घरातील सदस्यांना नेहमी त्रास देत होता. त्याचप्रमाणे, मारहाणही करत होता. त्यामुळे वैतागून वडिलांनी मुलाचा खून केला, असे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहे.