लघुदाब वर्गवारीतील सुमारे 2 कोटी 15 लाख ग्राहकांना वीजवापराप्रमाणे अचूक मीटर रीडिंगचे बिल देण्यासाठी महावितरणने फेब्रुवारीपासून विविध उपाययोजनांना सुरुवात केली आहे. यामध्ये हेतुपुरस्सर चुका व अचूक रीडिंगमध्ये निष्काळजीपणा केल्याचे आढळून आल्याने राज्यातील तब्बल 47 मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यातील 8 एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या धडक उपाययोजनांमुळे मीटर रीडिंगच्या बाबतीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली. महावितरणच्या महसूलात देखील वाढ झाली आहे.
वीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहकहिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत महावितरणने ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग दिला आहे. यात बिलिंगसाठी वीजमीटरच्या अचूक रीडिंगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबतीत आढावा घेताना 100 टक्के अचूक मीटर रीडिंग अपेक्षित असताना त्यात हयगय होत असल्याचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना आढळून आले. या प्रकाराची त्यांनी गंभीर दखल घेतली व महावितरणच्या इतिहासात प्रथमच राज्यातील सर्व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक तसेच क्षेत्रीय उपविभाग कार्यालयांचे प्रमुख व लेखा अधिकारी यांचीव्हीसीद्वारे आढावा बैठक घेतली होती.
8 एजेन्सी काळ्या यादीत
गेल्या चार महिन्यांमध्ये मीटर रिडींगच्या कामामध्ये हयगय करणाऱ्या तब्बल 47 मीटर रीडिंग एजन्सीजना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिमंडलातील 10, जळगाव- 8, अकोला 7, लातूर, कल्याण, बारामती व नाशिक- प्रत्येकी 4, औरंगाबाद- 2, तसेच पुणे, चंद्रपूर, कोकण व अमरावती परिमंडलातील प्रत्येकी एका एजन्सीचा समावेश आहे. यातील 8 एजन्सीजना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.
140 कोटी रुपयांनी महसुलात वाढ
ग्राहकांना रीडिंगनुसार वीजवापराचे योग्य वीजबिल मिळत असल्याने त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. सोबतच गेल्या एक महिन्यात वीजविक्रीमध्ये 199 दशलक्ष युनिटने म्हणजेच 140 कोटी रुपयांनी महावितरणच्या महसूलात वाढ झाली आहे.
चुकीचे मीटर रिडींग खपवून घेणार नाही
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी गुरुवारी (16 जून) मीटर रीडिंगचे फोटोघेण्यात आणखी सुधारणा आवश्यक असलेल्या 32 उपविभाग कार्यालयप्रमुख तसेच सर्व 147 विभाग कार्यालयप्रमुख अभियंत्यांशी व्हीसीद्वारे थेट संवाद साधला. ‘मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाईल अॅपद्वारे सोपी व वेगवान झालेली आहे. प्रत्येक मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना चांगला मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रिडींग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे आदी प्रकार होत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही’, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.