औरंगाबाद, 8 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका नेमकी काय आहे? याबाबत सविस्तर भाष्य केलं. यावेळी त्यांनी औरंगाबादचं नामांतरणच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजी महाराजांची मुघल बादशाह औरंगजेबने खूप हाल करुन हत्या केली होती. त्यावरुन औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावी, अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पण औरंगजेब नावाच्या सगळ्याच व्यक्ती सारख्या नसतात असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट करुन दिलं. यासाठी त्यांनी देशाच्या सीमेवर काश्मीरमध्ये शहीद झालेल्या औरंगजेब नावाच्या जवानाचा दाखला दिला.
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
“काश्मीरमध्ये आज काश्मीरी पंडितांची हत्या होतेय. असाच एक सैनिक होता. तो सैनिक आपल्या देशाकडून लढत होता. त्याने अनेक अतिरेकी मारले होते. तो गनमॅन होता. सुट्टी होती म्हणून घरी जायला निघाला. पण त्याचं रस्त्यातचं अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरु झाली. आणि मग एकेदिवशी छिन्नविछिन्न झालेला, हालहाल करुन मारलेला त्याचा मृतदेह लष्कराला सापडला. त्या सैनिकाचं नाव औरंगजेब असं होतं. जो आपल्या देशासाठी शहीद झाला. तो माझ्या देशासाठी लढला. जो माझ्या देशाला मातृभूमी समजतो, देशासाठी मरायला तयार आहे तो धर्माने कुणीही असला तरी तो आमचा आहे हे आमचं हिंदूत्व आहे”, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं .