अहमदनगर – नगर येथील आरटीओ कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक श्रीमती आयेशा हुसैन यांच्यावर नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात अफरातफरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालकाकडून पावतीद्वारे घेतलेली २३ हजार रुपयांची रक्कम आपल्या पदाचा गैरवापर करून शासन जमा न करता स्वतःच्या फायद्याकरिता वापरल्याचा ठपका ठेवून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नागपूर येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल नामदेव डाके यांनी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
श्रीमती आयशा हुसैन या मोटार वाहन निरीक्षक म्हणून १९ सप्टेंबर २०१९ ते ६ सप्टेंबर २०२९ या कालावधीत नागपूर येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (नागपूर शहर) याठिकाणी कार्यरत होत्या, सध्या त्या नगरला कार्यरत आहेत.
दरम्यान, ऑगस्ट २०२१ मध्ये मोटार वाहन निरीक्षक आयशा हुसैन यांची नेमणूक वायुवेग पथक -२ मध्ये करण्यात आली होती. दि. १८ ऑगस्ट २०२१ रोजी वाहन (क्रमांक एमएच ४० बीजी ८५७६) या वाहनाची तपासणी आयेशा हुसैन यांनी आमडी फाटा (परशिवनी रोड) परिसरात केली असता वाहनचालक चेतम नी रघुवंशप्रसाद मिश्रा यांच्या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करतांना आढळून आले. या वाहनावर ई-चालान (क्र. एमएच ६१६००२१०८१८१२१३४५) नुसार मोटार वाहन कायद्यातील कलम १३ / १९४ (१) प्रमाणे तडजोड शुल्क रुपये २३ हजार ईचालान प्रणालीवर उपलब्ध सुविधेनुसार पावती (क्र. एमएचसीआर ६१६००२१०८१८०२४८३६) अन्वये आयशा हुसैन यांच्याव्दारे रोखीने वसूल करण्यात आले होते.
सदरची रकम प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर शहर येथे भरणे आवश्यक होते, परंतु त्यांनी सदरची रक्कम भरणा केली नाही याबाबत दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी निदर्शनास आल्याने त्याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर शहर यांच्यामार्फत सुरू असलेल्या चौकशी दरम्यान आयशा हुसैन यांनी केलेल्या कारवाईबाबत माहिती घेऊन त्यांना दि. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी यांना कार्यरत असलेल्या ठिकाणी म्हणजे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय अहमदनगर याठिकाणी ज्ञापन पाठविण्यात आले असता, दिनांक १ मार्च २०२३ रोजी आयशा हुसैन यांनी फिर्यादीच्या मोबाईलवर संपर्क करून व्हाटसअॅपवर लेखी पत्र पाठविले व ज्ञापन प्राप्त झाल्याबाबत सांगुन कार्यालयातील थकीत असलेली शासकीय महसूल रक्कम रुपये २३हजार शासनजमा करीत असल्याबाबत विनंती केली होती.
या पत्राबाबत फिर्यादींनी वरिष्ठ अधिकारी यांना माहिती दिली.तसेच आयशा हुसैन यांनी दिलेल्या पत्राची कार्यालयात नोंद घेण्यात आली होती. दि. २ मार्च रोजी आयेशा हुसैन यांच्याकडून जाहिद अख्तर अजगर अली नावाच्या इसमाने सदरची रकम रोकड विभागात दिली व त्यानुसार या कार्यालयाने शासकीय महसुलाची रकम सुरक्षित करण्याकीता चालान (क्र. जी.आरएन एमएचओ ६२३०६५०२०२२२३) नुसार दि. ३ मार्चनुसार मुख्य लेखाशीर्ष यामध्ये शासनजमा करून घेतली. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांना माहिती देण्यात आली असता त्यांनी पुढील कारवाई करण्याचे दि. ९ मार्च रोजी आदेश दिले
श्रीमती आयेशा हुसैन यांनी सदरची शासकीय महसूल रक्कम भरणा करण्यास झालेल्या विलंबाबत विभिन्न कारणे सादर केली आहेत. परंतु सदरच्या पत्रानुसार सादर केलेली माहिती ही सत्यकथन नसून केलेल्या गैरव्यवहाराला पूर्णविराम देण्याकरीता केलेला व अवास्तव खटाटोप असल्याचे दिसून येते, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
मोटार वाहन निरीक्षक आयशा हुसैन यांनी गैरव्यवहार करण्याच्या हेतूने, आपल्या पदाचा गैरवापर करून सदर शासकीय रोख रकम स्वतःच्या वापराकरीता शासन जमा न करता जवळपास १८ महिने स्वतःच्या फायदयाकरीता वापरल्याचे स्पष्ट दिसून येते. आपल्या पदाचा दुरुपयोग करून शासकीय महसुलास हानी पोहोचवून, शासकीय अधिका-यास विश्वस्त म्हणून लागू असणा- या नियमांचे पालन करण्यात कसूर केला आहे. तसेच शासकीय महसुल रक्कम आपल्या पदाचा गैरवापर करून सदरची शासकीय महसूल रक्कम गैरव्यवहार करण्याच्या हेतूने, गैरपध्दतीने स्वतःच्या ताब्यात ठेवली असल्याने जाणीवपूर्वक लोकसेवकास अशोभनीय असे गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन केले आहे, असा ठपका ठेवून हा गुन्हा फौजदारीपात्र व्यासभंग या गुन्हे प्रकारात मोडत असल्याने त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिर्यादीत करण्यात आली आहे.