मुंबई : कश्मीरमधील दहशतवाद संपूर्णपणे नष्ट होईल, असं सांगणारं केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचे, जवानांचे आणि अनेक मुस्लीम पोलीस अधिकाऱ्यांचं रक्षण करु शकत नाही. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री केवळ निवडणुका आणि राजकारणात गुंतले आहेत, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. तसंच फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले आणि ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर यांच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, असंही राऊत म्हणाले. मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विविध मुद्द्यांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.
काश्मीरबाबत काय म्हणाले?
कलम 370 चा विषय नाही किंवा जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाला म्हणून देखील काही फरक पडलेला नाही. काश्मिरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत आणि सामुदायिक स्थलांतर करण्याचा संदर्भात त्यांनी सरकारला सूचना केली आहे. केंद्रातले सरकार हे प्रखर हिंदुत्ववादी आणि प्रखर राष्ट्रवादी आहे. काश्मिरी पंडित यांच्या घरवापसीबाबत आग्रही असलेले सरकार आहे. काश्मीरमधील दहशतवाद संपूर्णपणे खतम होईल असे सांगणारे सरकार आज काश्मीरमध्ये आमच्या काश्मिरी पंडितांचं, जवानांचं आणि अनेक मुस्लिम पोलीस अधिकारी जे या देशाची सेवा करत आहेत, त्यांचं रक्षण करु शकत नाहीत. देशाचे गृहमंत्री, पंतप्रधान हे केवळ निवडणुका आणि राजकारण याच्यामध्ये गुंतून पडलं आहेत. त्यांनी देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेकडे काश्मीरमधील प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे. दुर्दैवाने फक्त राजकारण, विरोधकांवर हल्ले आणि ईडी, सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर यांच्यात गुंतलेल्या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही, हे दुर्दैवी आहे, असं संजय राऊत म्हणाले.
